जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भवरलाल आणि कांताबाई जैन व परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या “मैत्र महोत्सव”च्या दुसऱ्या दिवशी अभिनेते प्रवीण माळी यांनी अहिराणी भाषेतील “आयत पोयत सख्यानं” हा एकपात्री प्रयोग सादर करत प्रेक्षकांना मनमुराद हसवले. या प्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय प्रबंधक प्रवीण कुमार सिंग, प्रभावती पाटील, शरद पांडे, नंदलाल गादिया, ज्ञानेश्वर शेंडे, डॉ. रेखा महाजन, विनोद पाटील व शिरीष बर्वे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याप्रसंगी फूड ब्लॉगर विक्रम संतोष मोरे यांचा सत्कार प्रवीण कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आला.

प्रवीण माळी यांनी आपल्या सादरीकरणातून खानदेशातील बोलीभाषा, तिचा खास लहेजा, इतिहास तसेच खानदेशी संस्कृतीचे विविध पैलू अत्यंत विनोदी आणि सहज शैलीत उलगडले. त्यांच्या अभिनयाने संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ माजला आणि महोत्सवाचा दुसरा दिवस प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरला.
या महोत्सवाला जैन उद्योग समूह आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. प्रेक्षकांची संख्या मोठी असल्याने जागेअभावी अनेकांना परत जावे लागले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी जोशी यांनी केले तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले.
दरम्यान, मैत्र महोत्सवात उद्या आसक्त पुणे या संस्थेचे अहिराणी नाटक “आईना” सादर होणार असून सायंकाळी ६.३० वाजता भाऊंचे उद्यान येथील एम्फी थिएटरमध्ये हा प्रयोग होणार आहे.



