फडणवीस मुंबईत आल्यावरच मराठा आरक्षणाचा पुढचा निर्णय – चव्हाण

मुंबई प्रतिनिधी । मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारहून मुंबईत आल्यानंतरच निर्णय घेतील, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारला गेले आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे. १५ तारखेला ते मुंबईत येतील. त्यानंतर फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याशी चर्चा करण्यात येईल आणि मराठा आरक्षणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आजच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत आणि अध्यादेश काढण्याबाबतही चर्चा झाली. पण फडणवीस आल्यावरच अंतिम निर्णय घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षण कायदा, राज्यातील विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश, भरती प्रक्रीया तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा याबाबत आज मुख्यमंत्र्याचा वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांचे आणि उमेदवारांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये यासाठी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

 

Protected Content