Home क्रीडा राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या आणि गुकेश – ग्रॅण्डमास्टर अभिजीत...

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून घडणार पुढचे दिव्या आणि गुकेश – ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे 


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावातील जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेने देशभरातील आणि परदेशातील बुद्धिबळ खेळाडूंना एकत्र आणले आहे. या स्पर्धेत ५३८ बुद्धिबळपटू सहभागी झाले असून, त्यांच्या योग्य निवास, भोजन व सर्व सुविधा जैन इरिगेशनच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे यांनी सहभागींशी संवाद साधत, ‘दिव्या देशमुख व गुकेश डोम्माराजू यांच्यासारखे खेळाडू अशाच स्पर्धांमधून घडतात’ असा विश्वास व्यक्त केला.

या स्पर्धेचे उद्घाटन अभिजीत कुंटे यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाले. त्यांनी सांगितले की, अशा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग घेतल्यास खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि मोठ्या मंचासाठी ते तयार होतात. त्यांनी सर्व युवक बुद्धिबळपटूंना चिकाटी, परिश्रम व सातत्य यावर भर देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या ज्योती अशोक जैन उपस्थित होत्या. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, सचिव निरंजन गोडबोले, कोषाध्यक्ष विलास म्हात्रे तसेच पंच देवाशीष बरूआ यांनीही उपस्थित राहून स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.

या भव्य स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मुख्य प्रायोजकत्व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड कंपनीने स्वीकारले आहे. यामुळे संपूर्ण स्पर्धा सुव्यवस्थित व दर्जेदार पद्धतीने पार पडत आहे.

मुलींच्या गटात, पहिल्या फेरीअखेर राशी वरुडेकर ने तेलंगणाच्या प्रत्युषा मित्रा चा खळबळजनक पराभव केला, तर लावण्या जुनेजा हिने झारखंड च्या दिशिता डे ला बरोबरीत रोखले. तर उत्तराखंड च्या लक्षीताने देखील केरळ च्या जानकी ला बरोबरीत रोखले.

दुसऱ्या फेरीमध्ये मानांकित खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे विजय नोंदवले असून तिसऱ्या फेरी च्या सुरवातीला ३६ खेळाडू २ गुणांसह आघाडीवर होते. महाराष्ट्राच्या प्रिशा घोलप, आश्वी अग्रवाल तर केरळची दिवि बिजेश, तामिळनाडूच्या श्रीनिका , पूजा श्री, त्रिपुरा ची आराध्या दास , दिल्ली ची अन्या गुप्ता, तेलंगणाची संहिता, पश्चिम बंगालची राजन्या मंडळ , आदित्री बैस्य तर आसाम ची मुग्धा कोट,कर्नाटकची रिश्विता महाजन आणि गुजरातची आरीनी सिंग या खेळाडूंची पहिल्या आठ पटावर झुंज चालू होती.

या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर येथील अवघ्या पाच वर्षांच्या वल्लभ अमोल कुलकर्णीपासून ते विविध वयोगटातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आठ वर्षाखालील आशियाई विजेता अद्वित अग्रवाल, १० वर्षाखालील पश्चिम बंगालचा विश्वविजेता मनिष शरबातो, सात वर्षाखालील जागतिक स्कूल गेम विजेती प्रणिता वकालक्ष्मी यांचा सहभाग लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, युएई, अबुधाबी, जर्मनी व मलेशिया येथील भारतीय वंशाचे १४ खेळाडूही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, हे जळगावसाठी अभिमानास्पद आहे.


Protected Content

Play sound