पुणे (वृत्तसंस्था) हॉटेलमधील बिलाच्या वादावरून झालेलं भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गळा चिरून खून करण्यात आला. हितेश मुलचंदानी (वय २३, रा. डी ब्लॉक, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, हितेश मुलचंदानी (वय २३, रा. डी ब्लॉक, पिंपरी) या तरुणाच्या मित्रांचे कासारवाडी येथील शीतल हॉटेलमध्ये बिलावरून वाद झाला होता. या किरकोळ वादाचे रूपांतर भांडणात झाले. हॉटेलमध्ये भांडण सुरू असल्याबाबत हितेशला त्याच्या मित्राचा फोन आला. त्यानंतर हितेशने त्याच्या काही मित्रांसोबत शीतल हॉटेल गाठले. हॉटेलमध्ये सुरू असलेली भांडणे सोडवत असताना चार इसमांनी हितेशला जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्यानंतर त्याला पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले. तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच त्याचा गळा चिरला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या हितेशचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.