बोदवड प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील मनूर येथील मजूराची दुचाकी बोदवड शहरातून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, कैलास तुकाराम हिवराळे (वय-४२) रा. मनुर ता. बोदवड जि. जळगाव हे हातमजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएच १०८९) क्रमांकाची स्लेंडर दुचाकी आहे. २३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता ते बोदवड शहरातील एका ठिकाणी कामासाठी दुचाकीवरून आले. बांधकाम करण्याच्या ठिकाणी दुचाकी पार्कींग करून ते कामाला निघून गेले. दुपारी जेवणाचा डबा घेण्यासाठी दुचाकीजवळ गेले असता त्यांना पार्किंगला लावलेली दुचाकी मिळून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. दुचाकीधारक कैलास हिवराळे यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोनाका गजानन काळे करीत आहे.