जळगाव (प्रतिनिधी) इस्लाम धर्मात अत्यंत महत्त्वाचा पवित्र समजला जाणारा महिना म्हणजे रमजान महिना होय. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम समाजातील लहान मुलांपासून तर वृद्धापर्यंत सर्व अल्लासाठी रोजा (उपवास) करतात. ३० रोजे झाल्यानंतर रमजान ईद असते, तो दिवस मुस्लिम समाजाचा अत्यंत आनंदाचा असा दिवस गणला जातो. रमजान महिन्याला उद्यापासून (दि. ७ मे) प्रारंभ होत असून याच्या पूर्वतयारीसाठी जळगाव शहरातील एकूण ४८ मशिदींमध्ये या रमजान महिन्याच्या स्वागताची तयारी पूर्ण झालेली आहे.
यंदा रोजे हे मे महिन्यात येत असल्याने प्रत्येक मशिदीत नमाजींसाठी आपापल्या कुवतीनुसार एसी- कुलर इत्यादी लावले गेले आहेत. तसेच या रमजानमध्ये ते तरावीची नमाज असल्याने ती सुमारे एक तास चालत असते. त्यात सुमारे ५० वेळा गुडघ्यांवर बसणे होत असल्याने त्रास होऊ नये म्हणून हिटलॉन व कालीनसुद्धा लावले गेले आहेत. प्रत्येक मशिदीत रोजा इफ्तार दररोज होत असल्याने त्याचीही तयारी करण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर रोजा इफ्तारची वेळ झाली हे कळावे म्हणून मशिदीवर विशिष्ट प्रकारचे सायरन व लाईटसुद्धा लावण्यात आले आहेत. मुस्लिम बहुल वस्तीमध्ये खास करून अकसानगर मेहरूण परिसरात ईद बाजाराचे आयोजन करण्यात आले असून यात सर्व प्रकारचे कपडे, जोडे, मौजे व काजू, खजूर, खोबरे यांची विक्री होणार आहे. हा बाजार पूर्ण महिना चालणार आहे.शहरात सुद्धा व्यापारी वर्गांनी खजूर आणि फ्रुट यांची मोठ्या प्रमाणात आवक केलेली असून त्याची फार मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. शहरातील सर्व बेकरी मध्ये हे रोट तयार करण्यात आले असून ते सहरीसाठी उपयुक्त असल्याने त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.शहरातील व जिल्ह्यातील सर्व मशिदीमध्ये साफसफाई रंगरंगोटी करण्यात आली असून स्वच्छता ही देवत्व खालोखाल असते, या म्हणीनुसार स्वच्छता ठेवण्यात येत असते.
त्याचप्रमाणे सर्व ईदगाह सुद्धा स्वच्छ व टापटीप केले जातात, जळगाव शहर ईदगाह ट्रस्टतर्फे विस्तारीकरण व सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून जलदगतीने ती कामे सुरू आहेत. शहर ईदगाहमध्ये नमाजींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने त्यांच्यासाठी यंदा सुमारे १५ ते २० हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्या जागेवर कॉंक्रिटीकरण व ब्लॉक लावण्यात आलेले आहेत.तसेच कब्रस्तानची साफसफाई करण्यात आलेली आहे.
रमजान कीटचे वाटप :- काही सामाजिक संघटनांनी जे समाजातील दुर्बल घटक या महिन्यात रोजे ठेवतात परंतु त्यांच्याकडे आवश्यक ती साधने व सोयी सवलती उपलब्ध नसतात त्यामुळे त्यांना रमजान किटच्या माध्यमाने संपूर्ण महिन्याचे किराणासह रोजा सहेरी व इफ्तारसाठी लागणारे साहित्य, त्याचप्रमाणे शीरखुर्मासाठी लागणारे ड्रायफ्रूट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने मुफ्ती हारून नदवी यांची ट्रस्ट, जळगाव जिल्हा मानियार बिरादरी व नव्यानेच एम्सचे विलीनीकरण झालेली इस्लामिक या संस्थेमार्फत हे किट उपलब्ध करून दिले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व मुस्लीम बांधवांना रमजान पर्वाच्या शुभेच्छा जळगाव शहर मुस्लिम ईदगाह व कब्रस्तानचे अध्यक्ष गफ्फार मलिक, जनरल सेक्रेटरी फारुक शेख व खजिनदार अश्फाक बागवान व समस्त ट्रस्टी यांनी दिल्या आहेत.