लाडकी बहीण योजनेचे पैसे १५ ऑगस्टपर्यंत खात्यात येणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सत्ताधारी महायुती सरकारच्या महत्त्वकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत येत्या 15 ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यांत जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत सरकार 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी बहुचर्चित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घोषित केली. या योजनेंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे. ही योजना 1 जुलैपासून लागू झाली. तिचा GR ही जारी झाला. या महत्त्वकांक्षी योजनेचा राज्यातील 3.50 कोटी महिलांना लाभ होण्याचा अंदाज आहे. पण या योजनेचे पैसे केव्हा मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. आता हा मुद्दाही स्पष्ट झाला आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आतापर्यंत या योजनेंतर्गत मिळालेल्या अर्जांवरून 16 जुलै रोजी तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 14 ऑगस्टला लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. साधारणतः 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व महिलांना ही रक्कम मिळेल. त्यानंतर दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा करण्यात येईल असे सांगितले जात आहे.

Protected Content