मानसिक संतुलन बिघडलेल्या धुळ्याच्या तरुणाला केले घरच्यांच्या स्वाधीन

जळगाव प्रतिनिधी । धुळे तालुक्यातील मानसिक संतुलन बिघडलेला एक तरुण गेल्या सहा-सात दिवसांपासून खेडी शिवारात फिरत होता. या तरुणाची विचारपूस करून येथील हर्षल कदम आणि त्याच्या मित्र परिवाराने या तरुणाच्या घरच्यांचा शोध घेतला. त्यास बुधवारी रात्री घरच्यांच्या स्वाधीन केले. या महितीबद्दल नातेवाईकांनी हर्षल आणि अन्य तरुणांचे आभार मानले आहे.

खेडी शिवारात मोकळ्या जागी गावातील अनेक तरुण क्रिकेट खेळायला जातात. या परिसरात गेल्या सहा- सात दिवसांपासून सुमारे 25 ते 30 वर्षाचा अनोखळी तरुण फिरतांना दिसला. त्याची विचारपूस केली असता त्याला काहीही सांगता आले नाही. तसेच तो काही दिवसांपासून उपाशी असल्यामुळे त्याला येथील रहिवासी हर्षल शिवाजी कदम आणि त्याच्या मित्रांनी जेवायला दिले. त्यानंतर त्या तरुणाची विचारणा केली असता त्याने धुळे तालुक्यातील नावरा येथील असल्याचे सांगितले. 

त्यानंतर हर्षलने धुळ्यातील एका मित्राला संपर्क करुन या तरुणाच्या घरच्याचा शोध घेण्यास सांगितले.  दरम्यान, या तरुणाचा फोटो ओळखून नातेवाईक धुळ्याहून निघाले. बुधवारी रात्री उशिरा जळगावला पोहचल्यानंतर संदीप शिवराम बावस्कर (वय 25, रा.नावरा,ता.धुळे) या तरुणास आपल्यासोबत घेवून गेले. हा तरुण 15 जूनपासून घराच्या बाहेर असल्याचे समजते. तसेच मदतीला धावून आलेल्या हर्षल आणि  मित्र परिवाराचे नातेवाईकांनी आभार मानले. दरम्यान, हा तरुणाने मानसिक संतुलन बिघडल्याने तो जळगावला असावा. तो हरविल्याबाबत धुळे येथील तालुका पोलीस स्टेशनमध्ये हलविल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

 

Protected Content