अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेतातील पातोंडाहून तापी काठावर असलेल्या मठगव्हाण, रुंधाटी, नालखेडा, गंगापुरी, खापरखेडा, मुंगसे आदी गावांना जोडणारा रस्ता आहे. सदर रस्त्याचे मराठी शाळेपासून पुढे रस्त्याचे काम झालेले असून ग्राम पंचायत चौक पासून ते महावितरण कार्यालयापर्यंत गावातून जाणारा रस्ता पूर्णतः खड्डेमय झालेला असून सदर रस्ता सा. बां.विभागाने काम न करता सोडून दिला असून सदर रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असून अपघाताची शक्यता असल्याने सदर रस्त्याचे काम सा. बां. विभागाने तात्काळ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पद्माकर वाघ व ग्रामस्थांनी केलेली आहे.
पातोंडा मठगव्हाण रस्ता हा पातोंडा महावितरण केंद्रापासून ते न्यू प्लॉट परिसर, ग्राम पंचायत चौक मधून निघतो. काही महिन्यांपूर्वी सदर रस्त्याचे काम मराठी शाळेपासून ते मठगव्हाण पर्यंत पूर्ण झाले. मात्र महावितरण केंद्रापासून ते गावातील हॉटेलपर्यंत जवळपास अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम केले नाही. परिणामी त्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून ग्राम पंचायत समोरील दर्शनी भागात खड्ड्यात पाण्याचे डबके तयार झालेले आहेत. डबक्यातील पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी व चार चाकी वाहने रस्त्यावर जोरात आदळतात त्यामुळे अपघाताची दाट शक्यता असून आणि रस्त्याचे आजूबाजूला अतिक्रमणाचा विळखा असल्याने एस. टी. बसला व मोठ्या वाहनांना तेथून मार्ग काढणे जिकरीचे होते. अंदाजे अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम न करायला सार्वजनिक बांधकाम विभागाला काय कारण निर्माण झालं असेल असा प्रश्न वाहन धारकांना व ग्रामस्थांना पडत आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर अपूर्ण राहिलेल्या रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.