मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर मोठा फेरबदल केला आहे. जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन नगरपंचायतींसाठी आ.चंद्रकांतभाऊ पाटील यांची ‘शिवसेना निवडणूक रावेर, सावदा आणि मुक्ताईनगर नगरपंचायत प्रमुख’ म्हणून अधिकृतरित्या नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही महत्त्वाची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेने हा निर्णय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ च्या अनुषंगाने घेतला आहे. आ.चंद्रकांत पाटील यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा फायदा घेत, या तिन्ही भागांतील पक्षाची ताकद वाढवणे आणि निवडणुकीत प्रभावी कामगिरी करणे, हा या नियुक्तीमागील मुख्य उद्देश आहे.

या नियुक्तीनंतर, आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील रावेर, सावदा आणि मुक्ताईनगर नगरपंचायत क्षेत्रांतील संपूर्ण शिवसेना परिवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक बळकट होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक यश प्राप्त करेल. या नियुक्तीबद्दल अनेक शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



