मद्रिद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या शानदार कारकिर्दीत २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली. या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलागा येथे होणारी डेव्हिस कप फायनल नदालची शेवटची स्पर्धा असेल. या वर्षाच्या सुरुवातीला पॅरिस ऑलिम्पिकनंतर तो एकही सामना खेळलेला नाही. १९ ते २१ नोव्हेंबर दरम्यान डेव्हिस कप फायनलमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा सामना नेदरलँड्सशी होणार आहे. दुखापतीमुळे ग्रुप स्टेजला मुकल्यानंतर नदालचा संघात समावेश करण्यात आला होता.
निवृत्तीची घोषणा करताना एका व्हिडिओमध्ये नदाल म्हणाला की, जीवनातील प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट आहे. त्याला असे वाटते की, त्याच्या यशस्वी कारकीर्द संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. तो म्हणाला की, दोन दशकांहून अधिक कालावधीच्या कारकिर्दीनंतर मी व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेत आहे. आपली शेवटची स्पर्धा डेव्हिस कप फायनल असेल, ज्यामध्ये तो आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करेल, असेही त्याने सांगितले. याबद्दल तो खूप उत्साहित आहे.