बेंगळुरू, वृत्तसंस्था | कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारचे भविष्य काय असेल ? याचा निर्णय आज रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता होती. मात्र विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पुन्हा उद्या सकाळी ११.०० वाजेपासून विधानसभेत सुरु होणार आहे. त्यामुळे सरकारवरील आजचे संकट उद्यावर गेले आहे.
आज दिवस संपेर्यंत कुमारस्वामी सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे लेखी पत्र कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी अध्यक्ष रमेश कुमार यांना दिले, मात्र दुसरीकडे, सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या पत्राला अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे, या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहातच धरणे आंदोलन करणार आहेत.
सुमारे दोन आठवडे सुरू असलेल्या राजकीय सत्ता नाट्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या दरम्यान, सदनात बंडखोर आमदारांसह १९ आमदार गैरहजर राहिले. राज्यपालांनी रमेश कुमार यांना लिहिले की, ‘विश्वासदर्शक ठराव’ यावेळी सभागृहाच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की, ते सभागृहाच्या विश्वासास कायम पात्र राहतील. आज दिवस संपेपर्यंत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान घेण्याबाबत विचार करा.’ काँग्रेसने मात्र राज्यपालांच्या अशा हस्तक्षेपाबाबत आक्षेप घेतला आहे. ‘राज्यपालांनी संविधानानुसार सदनाच्या कामकाजात दखल द्यायला नको,’ असे काँग्रेसचे आमदार एच.के. पाटील यावेळी म्हणाले.