शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रमाणे शहिदांचे बलिदानही महत्त्वाचा मुद्दा – मोदी

images 1 4

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शहीद जवांनाचा उल्लेख करुन मत मागितल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला जातो. या आरोपांवर मोदी यांनी उत्तर देत विरोधकांना प्रतिप्रश्न केला आहे की, देशात शेतकऱ्यांचा मृत्यू जेवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, तेवढाच देशभक्ती आणि शहिदांचे बलिदान निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे आहेत. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिलं.

 

या मुलाखतीत मोदी पुढे म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून देश दहशतवादाशी लढतोय. जर देशातील लोकांसमोर जर आम्ही सांगितले नाही, देशातील दहशतवादावर आमचे विचार काय आहेत तर त्याला अर्थ काय राहणार ? कोणताही देश देशभक्तीच्या भावनेशिवाय पुढे जाऊ शकतो का ? असा प्रश्न पंतप्रधानांनी विरोधकांना केला आहे.

हजारो भारतीय जवान देशासाठी शहीद होतात, मग हा मुद्दा निवडणुकीत का नको ? जेव्हा शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तो मुद्दा निवडणूक प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनतो मग जेव्हा एक जवान देशासाठी शहीद होतो तर तो निवडणुकीचा मुद्दा का असू शकत नाही ? असेही मोदी यांनी सांगितले.

मागील आठवड्यात नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना तुमचं पहिलं मत हे देशासाठी शहीद झालेल्या जवानांना समर्पित करा असं आवाहन जाहीर व्यासपीठावरुन केलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आरोप केला होता. शहीद जवानांच्या नावाचा वापर पंतप्रधान लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करुन याचं राजकारण करत असल्याचा आरोप केला जात होता त्यावर पंतप्रधानांनी भाष्य केलं आहे.

Add Comment

Protected Content