Home Cities जळगाव कृषि प्रदर्शनाच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

कृषि प्रदर्शनाच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम २०२५ च्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या निमित्ताने जळगाव येथे शेतकरी बांधवांसाठी विविध कृषी उत्पादने, खते, बी-बियाणे आणि प्रचार साहित्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. या स्टॉल्सचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

या उद्घाटन समारंभाला रावेरचे आ. अमोल जावळे, पारोळ्याचे आ.अमोल चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल, जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुनिलकुमार दोहरे आणि सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक रमेश जेठानी यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात उभारलेल्या स्टॉल्समध्ये शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे उन्नत व सुधारित बी-बियाणे, जैविक तसेच रासायनिक खते, पीक संरक्षण व रोग नियंत्रणासाठी लागणारे साहित्य, आधुनिक कृषी यंत्रे आणि नवीन तंत्रज्ञान तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देणारी पत्रके व मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळेल, तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनांचे मार्गदर्शन लाभेल. यासोबतच, कृषी उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांचे योग्य संवर्धन करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांची माहितीही त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध झाली आहे. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांनी या महत्वपूर्ण संधीचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound