नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात काही शहरांची, रस्त्यांची नावं बदलण्याचा मुद्दा बऱ्याचदा चर्चेत येतो. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही होताना दिसतात. अशा रस्ते किंवा शहरांना कुठली नावं द्यायची, त्यांचा संदर्भ कुणाशी आहे अशा अनेक बाबतीत टीका-टिप्पणीही केली जाते. मात्र, आता थेट राष्ट्रपती भवनातील काही अत्यंत महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉलची नावं बदलण्यात आली आहेत. खुद्द राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच यासंदर्भातली घोषणा केली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार दरबार हॉल आणि अशोक हॉल अशी या दोन हॉलची आधीची नावं होती.
दरबार हॉल आणि अशोक हॉल हे राष्ट्रपती भवनातल्या काही महत्त्वाच्या हॉलपैकी दोन हॉल आहेत. यातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय पुरस्कार प्रदानासारखे अनेक महत्त्वाचे सोहळे पार पडतात. तर दुसरीकडे अशोक हॉलमध्ये विशेष कार्यक्रम घेतले जातात. या दोन्ही हॉलची नावे बदलण्यासंदर्भात राष्ट्रपती भवनाकडून निवेदन जारी करण्यात आले असून त्यात यासंदर्भात प्रयत्न केले जात होते, असं नमूद करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचं नामकरण आता ‘गणतंत्र मंडप’ असे करण्यात आले आहे. तर अशोक हॉल इथून पुढे ‘अशोक मंडप’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘दरबार हा शब्द प्रामुख्याने भारतीय शासक व ब्रिटिशांच्या न्यायनिवाड्याच्या जागेशी संबंधित आहे. पण भारत प्रजासत्ताक राष्ट्र अर्थात गणतंत्र झाल्यापासून हा शब्द गैरलागू झाला आहे.
अशोक हॉल हा मुळात बॉलरूम म्हणून वापरला जायचा. अशोक हा शब्द सर्व प्रकारच्या वेदनांपासून मुक्त अशा अर्थाने वापरला जातो. त्याशिवाय, सम्राट अशोकाच्या नावानेही हे नाव जोडलं जातं. त्याशिवाय, भारतीय रूढी-परंपरांमध्ये महत्त्वाचं स्थान असणाऱ्या अशोक वृक्षाशीही हे नाव जोडलं जातं. ‘अशोक हॉलचं नामकरण अशोक मंडप असं केल्यामुळे भाषेची एकता साधली जाते, नावांच्या इंग्रजीकरणापासून दूर राहता येतं आणि अशोक शब्दाशी निगडीत मुलभूत तत्वही त्यातून प्रतिबिंबित होतात’, असं राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.