मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूर येथील शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलत सोमवारी पीडित मुलींच्या कुटूंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. महिला व बालविकास विभागामार्फत मुलीच्या कुटुंबाला ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबरसरकारने अन्य एका चार वर्षांच्या मुलीच्या कुटुंबासाठी ३ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याचबरोबर दोन्ही मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.
बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी शालेय शिक्षण विभागाने एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीचा अहवाल समोर आला असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज हा अहवाल वाचून दाखवला.या घटनेच्या चौकशीत काही पोलीस अधिकारी दोषी आढळल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना निलंबित करण्यात आले आहे,तपासादरम्यान त्यांनी काही माहिती लपविल्याचे निष्पन्न झाले आहे.