जळगाव, प्रतिनिधी | अण्णासाहेब बेंडाळे प्रतिष्ठान, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी आणि झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गीता पठन स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी हा उपक्रम ५ जानेवारी रोजी घेण्यात येणार असून यासोबतच चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रा. किसन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी चंद्रकांत भंडारी, डॉ. अशोक राणे, प्रणिता झांबरे, शशिकांत वडोदकर, प्रा. मीनल झांबरे आदी उपस्थित होते.
गीता पठन स्पर्धेत ५ वी ते १० वी पर्यन्तचे विद्यार्थी हे तीन गटात तर चौथा गट सांघिक असणार आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना गीते मधील एका अध्यायाचे काही श्लोक पाठांतरास दिले जातात. यातील चांगल्या स्पर्धकांना बक्षीस दिले जाते. या गीता पठन स्पर्धेचे हे १६ वे वर्ष असून स्पर्धेत जवळपास १२०० ते १५०० विद्यार्थी सहभागी होत असतात. या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, शिक्षक आदी आलेले असतात. त्यांच्यावर गीतेचा संस्काराचा व्हावा यासाठी दिवसभरासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. यात पाठांतर, उच्चारण आणि यानंतर गीतेचे अर्थनिर्धारण आणि बाल मनावर संस्कार करणारे असे काही उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत असतात. गीता पठन स्पर्धेसोबत यावर्षी गीतेवर आधारीत चित्रकला स्पर्धा ५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. पालक व शिक्षकांसाठी प्रबोधनाचा कार्यक्रम ‘संस्कार गीता’ चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने ६ जानेवारी रोजी मंगला खाडिलकर यांचे दोन कार्यक्रम घेण्यात येणार असून यात एक विद्यार्थ्यांसाठी व दुसरा कार्यक्रम मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन सूत्रसंचालन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.