Home Cities अमळनेर मराठा समाज  सक्षमीकरणाची दिशा ठरवणारा अमळनेर येथील गौरव सोहळा

मराठा समाज  सक्षमीकरणाची दिशा ठरवणारा अमळनेर येथील गौरव सोहळा


अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्यानंतर देशात सुरू झालेल्या जातीपातीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी उभ्या राहिलेल्या चळवळीला बळ देणारा एक प्रेरणादायी सोहळा अमळनेरमध्ये पार पडला. मराठा समाजाच्या वाटचालीत ऐतिहासिक ठरणाऱ्या या कार्यक्रमात समाजभूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि नव्या भोजन कक्षाचे भूमिपूजन अशा अनेक उपक्रमांची सांगड घालण्यात आली.

५ ऑक्टोबर रोजी मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे झालेल्या या कार्यक्रमात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या जातीय राजकारणात मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी सर्वप्रथम मागणी अण्णासाहेब पाटील यांनी केली होती. आज माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले आहे, असा ठाम दावा आमदार नरेंद्र पाटील यांनी केला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अनिल पाटील होते. त्यांनी समाजाच्या संचालक मंडळाकडून होत असलेल्या सकारात्मक कामांची प्रशंसा करताना सांगितले की, समाजातील प्रत्येकाने एक दिवस समाजासाठी देण्याची गरज आहे. अमळनेर तालुक्यातील मराठा तरुणांना आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून उद्योगासाठी मदत मिळावी, असे आवाहनही त्यांनी आमदार नरेंद्र पाटील यांना केले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजभूषण पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये आमदार नरेंद्र पाटील, आमदार अमोल पाटील, ढेकू बुद्रुकचे उपसरपंच नत्थू सोनवणे, अमळगावचे लोकनियुक्त सरपंच गिरीश पाटील, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, आरटीओ मयूर निकम आणि ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील यांचा समावेश होता.

प्रमुख अतिथी म्हणून खासदार स्मिता वाघ, आमदार अमोल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, सभापती अशोक पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील आणि तिलोत्तमा पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिव विक्रांत पाटील, सहसचिव प्रवीण पाटील, कोषाध्यक्ष महेंद्र बोरसे, तसेच एस. एम. पाटील, मनोहर पाटील, चंद्रकांत काटे, स्वप्नील पाटील, जे. पी. पाटील, संजय पुनाजी पाटील, कैलास पाटील, डॉ. सुमित पाटील, गौरव पाटील, भूषण भदाणे, सुलोचना वाघ आणि पद्मजा पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.

कार्यक्रमादरम्यान अनेक दात्यांनी उदारहस्ते देणग्या दिल्या. नत्थू सोनवणे यांनी ₹१,००,०००, गिरीश पाटील यांनी ₹५१,०००, हरीश देधमुख यांनी ₹११,०००, तर हेमंत पाटील यांनी ₹११,००० देणगी जाहीर केली. याशिवाय सभापती अशोक पाटील, विक्रांत पाटील आणि महेंद्र बोरसे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.


Protected Content

Play sound