यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संपूर्ण परिसराला हादरवून सोडणाऱ्या तालुक्यातील चितोडा गावातील भंगाळे यांच्या खून प्रकरणी पोलीसांच्या तपासाला वेग आला असून या खुनात सहभागी असलेल्या चौथ्या आरोपीस पकडण्यात पोलीसांना यश मिळाले आहे.
यावल तालुक्यातील चितोडा शिवारात रविवार, दि. २१ ऑगस्टच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास सांगवी येथील शेतकरी चंद्रकांत निंबा चौधरी यांच्या शेतात मनोज संतोष भंगाळे राहणार चितोडा यांचा उसनवारीच्या पैशावरून अत्यंत निर्दयीपणे तीक्ष्ण हत्याराने निघृण खून करण्यात आला होता. पोलीसांनी मोबाइलच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवूनन काही तासातच या खुनात सहभागी असलेल्या संशयीत आरोपींना शोधण्यास यश मिळाले. यात एक महिलेसह तीन जणांना अटक करण्यात आली असून आज बुधवार, दि. २४ ऑगस्ट रोजी यावल शहरातील नगर परिषदच्या घनकचरा डंपिंग ग्राउंडच्या परिसरात चौथा संशयीत आरोपी जितेन्द्र उर्फ आतंक भगवान कोळी राहणार अट्रावल तालुका यावल हा या ठिकाणी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच यावलचे पोलीस निरिक्षक राकेश माणगावकर, पोलीस उप निरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चौथ्या संशयीत आरोपीस पकडण्यात यश मिळवले आहे. या मनोज भंगाळे खून प्रकरणी अजून आरोपी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान खून प्रकरणातील तीन संशयीत आरोपींना २९ ऑगस्टपर्यंतची पोलीस कोठडी यावल न्यायालयाकडून मिळाली आहे.