नागपूर वृत्तसंस्था । क्रिकेट विश्वचषकापासून सुरु असलेला भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. संघ व्यवस्थापनाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर याच्या नावाला हिरवा कंदिल दिला आहे. यापुढे मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये युवा फलंदाज श्रेयस हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणार आहे.
बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० लढतीत श्रेयस अय्यरनं ३३ चेंडूत ६२ धावांची तडाखेबंद खेळी केली. यानंतर त्यानं माध्यमांशी संवाद साधला. ‘चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहेस, स्वतःवर विश्वास ठेव असं संघ व्यवस्थापनाकडून मला सांगण्यात आलं आहे,’ अशी माहिती श्रेयसनं दिली. ‘चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी माझी निवड होण्यास गेल्या काही मालिका महत्वपूर्ण ठरल्या. या क्रमांकावर खेळण्यासाठी आमच्यात जणू एकप्रकारे स्पर्धाच सुरू होती,’ असंही श्रेयस म्हणाला. टीम इंडियातील दोन प्रमुख फलंदाज कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे लवकर बाद झाले तर, श्रेयस ‘फिनिशर’ची भूमिका निभावणार आहे, असंही मानलं जात आहे.
अय्यर गेल्या काही सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरत असला तरी, संघाच्या गरजेनुसार कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी त्यानं दाखवली आहे. ‘मी वास्तवात खुलेपणानं बोलतो. मी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार आहे. म्हणून मी कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मी दबावातही खेळू शकतो हे आजच्या खेळाने दाखवून दिली आहे,’ असे श्रेयस म्हणाला. ‘जर विराट कोहली आणि रोहित शर्मा हे बाद झाले तर आम्हाला शेवटपर्यंत मैदानावर टिकून खेळणारा फलंदाज हवा आहे. हीच भूमिका चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरणाऱ्या खेळाडूची असते. मी आज तेच करण्याचा प्रयत्न केला आणि एकूणच चांगली खेळी केली,’ असेही श्रेयस यावेळी म्हणाला.