लोहितपूर (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला असून ११ एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे. मात्र देशात एक अशी जागा आहे जिथे हे मतदान सुरूही झालं आहे. भारत -तिबेट सीमा सुरक्षादलाच्या अरुणाचल प्रदेशमधल्या चौकीवर शुक्रवारी (5 एप्रिल) हे मतदान घेण्यात आले. देशाच्या संरक्षणासाठी प्राण तळ हातावर घेऊन लढणाऱ्या जवानांना यावेळी मतदानाचा पहिला मान देण्यात आला आहे.
भारत-तिबेटची ही सीमा अरुणाचल प्रदेशमधून जाते. लोहितपूरमध्ये पोस्टल मतदानाच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा पोलिसांनी मतदान केलं आहे. यामध्ये ८० पोलिसांचा समावेश होता. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही आहे. भारत-तिबेट पोलीस दलात देशभरातल्या विविध भागांतून आलेले पोलीस कर्मचारीही आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या उमेदवारांसाठी हे मतदान केलं आहे. आयटीबीपीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, डीआयजी सुधाकर नटराजन यांनी जवानांमध्ये सर्वप्रथम मतदान केले.
यंदा पोस्टल मतदानाचा टक्का वाढणार-
लोकसभा निवडणूकीमध्ये अधिकाधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा; या उद्देशाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विविध मोहिमा राबविल्या जात आहेत. लष्करात सेवेत असणाऱ्या जवानांपासून निवडणूकीचे काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पोस्टल बॅलेटचा मतदानाचा टक्का वाढेल, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनातर्फे मतदार जागृतीबाबत कार्यक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबरच प्रत्यक्षात मतदान केंद्रावर जावून मतदान करता येऊ न शकणाऱ्या मतदारांना उपलब्ध असणाऱ्या पयार्यांची माहिती दिली जात आहे. पूर्वी पोस्टाने मतपत्रिका मतदाराला पाठविणे आणि मतदाराने पुन्हा मत मोजणीपूर्वी पोस्टाने पोहच करणे यात वेळ जात होता. त्यामुळे अनेकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येत नव्हता. मात्र,मतदान आणि मतमोजणी यांच्यात तब्बल एक महिन्याचे अंतर आहे. त्यामुळे पोस्टाने पाठविलेली प्रत्येक मतपत्रिका मत मोजणीपूर्वी पोहचण्याची शक्यता वाढली आहे. त्याचप्रमाणे पोस्टल मतदान कसे करावे; याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेकडून पोलिसांसह महसूल व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.