जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महापालिका निवडणुकीनंतर आज सोमवार, ३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता पार पडलेली पहिलीच महासभा प्रचंड वादळी ठरली. आरोग्य, स्वच्छता, कचरा संकलन आणि पाणीपुरवठा या मूलभूत प्रश्नांवरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विशेषतः कचरा संकलनात होणारा भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर यावेळी कडाडून टीका करण्यात आली.
व्यासपीठावर महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि नगरसचिव सतीश शुक्ला उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा, नितीन बरडे आणि माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी प्रशासकीय काळात रखडलेल्या कामांचा पाढा वाचला.

कचरा संकलनात मातीचा ‘खेळ’:
सभेतील सर्वात खळबळजनक मुद्दा कचरा संकलनाचा ठरला. शहरात कचरा उचलणाऱ्या ‘बीव्हीजी’ या मक्तेदाराकडून ट्रॅक्टरमध्ये कचऱ्याऐवजी माती भरून वजन वाढवले जात असल्याचा गंभीर आरोप उपमहापौर आणि नगरसेवकांनी केला. नितीन बरडे यांनी याचे पुरावे म्हणून तब्बल १२५ फोटो आणि व्हिडिओ थेट उपायुक्तांच्या मोबाईलवर सादर केले. कचरा मोजणीच्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा दावा करत, संबंधित मक्तेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. याची दखल घेत आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांची खरडपट्टी आणि आंदोलनाचा इशारा:
समता नगर परिसरात घंटागाडी येत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावर संताप व्यक्त करताना नितीन बरडे म्हणाले की, “जर तात्काळ घंटागाडी सुरू झाली नाही, तर स्वखर्चाने कचरा उचलून तो आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर फेकू.” दुसरीकडे, माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी जळगाव-भुसावळ रोडवरील स्वामीनारायण मंदिर परिसरातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित केला. अनेकवेळा पाठपुरावा करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. एकूणच, नवनिर्वाचित महापालिकेची पहिलीच सभा प्रशासकीय दिरंगाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांनी गाजली असून, आगामी काळात अधिकारी आणि सत्ताधारी यांच्यात संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.



