इस्लामाबाद, वृत्तसंस्था । आर्थिक संकटातील पाकिस्तान चीनच्या जाळ्यात अडकतच आहे. इकॉनॉमिक कॉरिडोर प्रकल्पाच्या माध्यमातून पाकिस्तानचा पाय आणखीच खोलात जात आहे. पाकिस्तानने आपला समुद्रही चीनच्या ताब्यात दिला आहे. पाकिस्तानने विशेष आर्थिक क्षेत्रात चिनी जहाजांना मासेमारी करण्यास परवानगी दिली आहे. पाकिस्तान सरकारच्या या निर्णयाविरोधात स्थानिक मच्छिमारांनी आंदोलन सुरू केले आहे.
पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे कराचीतील मच्छिमारांना धक्का बसला आहे. हजारो मच्छिमारांनी चीनविरोधातही आंदोलन सुरू केले. चीनहून खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी कराचीत मोठ्या २० ट्रॉलर दाखल झाल्या आहेत. या चिनी जहाजांना सिंध आणि बलुचिस्तानच्या किनाऱ्याजवळ मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
चिनी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू शकतात. त्यामुळे समुद्रातील संतुलन बिघडण्याची भीती असून पाकिस्तानच्या मच्छिमारांना त्याचा फटका बसणार आहे. पाकिस्तानच्या किनारी भागात माशांची संख्या ७२ टक्क्यांनी कमी झाली आहे. प्रमाणाहून अधिक मासेमारी केल्यामुळे माशांची संख्या कमी झाली आहे.
पाकिस्तानमध्ये जवळपास २५ लाखजणांचा उदरनिर्वाह मासेमारीवर चालतो. हे मच्छिमार छोट्या नौकांचाही वापर करतात आणि खोल समुद्रात जाऊ शकत नाहीत. याउलट चिनी जहाज हे खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात आणि मोठ्या प्रमाणावर मासे पकडू शकतात.