
जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्या निर्देशानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची अंमलबजावणी यापुर्वीच सुरु करण्यात आलेली होती. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व भडगाव तहसिलदार गणेश मरकड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकरी कुटुंबासाठी यापूर्वी 2 हेक्टर पर्यंत धारण क्षेत्राची मर्यादा होती. तथापि आता केंद्र शासनाने पात्र शेतकरी कुंटुबाची 2 हेक्टर पर्यंत धारण क्षेत्राची मर्यादा शिथील केली आहे. या योजनेतंर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना प्रती वर्षी तीन समान हप्त्यामध्ये सहा हजार रुपये वितरीत करण्यात येणार आहे. तरी क्षेत्र मर्यादेची कोणतीही अट नसल्याने सर्व पात्र शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्तरावर नियुक्त तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक या क्षेत्रीय अधिकारी यांचेशी संपर्क साधुन आपला राष्ट्रीयकृत बॅक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा, असे आवाहन पाचोरा उपविभागाचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे व भडगाव तहसिलदार गणेश मरकड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.