
सातारा (वृत्तसंस्था) ‘निवडणूक हरलो आहे, पण संपलो नाही,’ असे काव्यात्मक ट्विट सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत लाखांहून अधिक मतांनी दणदणीत पराभव झालेले उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पराभवाचा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनीवास पाटील यांनी उदयनराजेंवर मात करत सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राखली. साताऱ्याचा निकाल हा भाजपा आणि महायुतीसाठी धक्कादायक मानला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करत पोटनिवडणुकीत उडी मारली होती, मात्र त्यांचं हे पक्षांतर मतदारांना अजिबात रुचले नाही. या पराभवानंतर उदयनराजेंनी, जिंकलो नाही पण संपलो ही नाही अशा आशयाचे ट्विट करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.