नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | समाजसेवा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या खिदमत ए खल्क कमिटीने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपत 30 महिलांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात उभे केले. रविवारी दि. 6 एप्रिल रोजी झालेल्या एका विशेष कार्यक्रमात 24 प्रशिक्षणार्थींनी यशस्वीपणे लेडिज टेलरिंग व फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त केले. यासोबतच काही महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत सिलाई मशीनचेही वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील नामवंत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जस्मिन बेग, रहेनुमा उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शिरीन सय्यद आणि मोटिवेशनल स्पीकर नजनीन खान यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन दिले.
खिदमत ए खल्कचा हा उपक्रम ऑल इंडिया सुन्नी जामिअतुल उलेमाचे अध्यक्ष आणि पैगंबर मोहम्मद साहेबांचे वंशज हजरत मोईन मिया यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमध्ये राबवण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश निराधार, गोरगरीब व होतकरू महिलांना रोजगार आणि आत्मनिर्भरतेच्या वाटेवर नेण्याचा आहे. खिदमत ए खल्क कमिटीकडून फक्त प्रशिक्षण नव्हे, तर प्रशिक्षणोत्तर मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आजपर्यंत शेकडो महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बागवानपुरा, जुने नाशिक येथील खिदमत ए खल्क कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरमध्ये येत्या 10 एप्रिलपासून नवीन लेडिज टेलरिंग व फॅशन डिझायनिंग कोर्सला सुरुवात होणार आहे. या मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. खिदमत ए खल्क कमिटीने जास्तीत जास्त महिलांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. खिदमत ए खल्कचा हा सामाजिक बदल घडवणारा प्रयत्न केवळ रोजगारापुरता मर्यादित न राहता महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ठरत आहे. सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाउल अनेक घरांचे भवितव्य उजळवणारे ठरू शकते.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे – पासपोर्ट साइज फोटो, 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र, आधार कार्ड झेरॉक्स