जळगाव (प्रतिनिधी) येथील हरेश्वर नागरतील रहिवासी असलेल्या दर्शना आशिष अजमेरा या महिलेने आज दुपारी आपल्या पतीने मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार जिल्हापेठ पो.स्टे. ला दिली आहे.
अधिक माहिती अशी की, दर्शना आणि त्यांचे पती आशिष चंद्रकांत अजमेरा हे दोघे वर्धमान युनिव्हर्स अकादमीच्या सीबीएसई स्कूलचे संचालक आहेत. आज सकाळी स्कूलच्या कार्यालयात मिटिंग सुरु असताना दर्शना अजमेरा यांनी प्रोसिडिंग बुक मागितल्याचा राग येवून त्यांचे पती आशिष अजमेरा यांनी भर मिटिंगमध्ये त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळही केली. तसेच तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकीही दिली असल्याचे दर्शना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत फिर्यादीला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.