जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाच्या धोरणात्मक उदासीनतेमुळे बारा बलुतेदार समाजाचा सर्वांगीण विकास थांबला असून, सत्तेपूर्वी केलेल्या घोषणा केवळ आश्वासनापुरत्याच उरल्या आहेत, अशी तीव्र खंत नाभिक समाज महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी व्यक्त केली. शासनाकडून निधी नाकारला जात असून, समाजाची शुद्ध फसवणूक सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जळगाव येथे आयोजित नाभिक समाज स्नेहमेळाव्यात कल्याणराव दळे बोलत होते. यावेळी नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष दामोदर बिडवे, प्रदेश सचिव पांडुरंग भंवर, महिला प्रदेशाध्यक्षा भारतीताई सोनवणे, कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष उत्तमराव सलोने, किशोर सूर्यवंशी, सुनिल बोरसे, रविंद्र शिरसाठ, मावळते अध्यक्ष रविंद्र नेरपगार, उपाध्यक्ष शिवाजी बहाळकर, चंद्रकांत शिंदे, उमाकांत निकम, प्रशांत बाणाईत, सचिव संजय पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.

या मेळाव्यात नाभिक महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. पश्चिम विभागासाठी किशोर मधुकर वाघ, तर पूर्व विभागासाठी सचिन सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून चंद्रकांत शिंदे व सरचिटणीस म्हणून संजय पवार यांची घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे जिल्ह्यातील नाभिक समाज संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किशोर सैंदाणे, उपसंपादक सतिष बोरसे, पत्रकार संजय पवार, अॅड. भरत ठाकरे, होमगार्ड लिपिक हिलाल नेरपगारे, संजय वखरे, हभप सरला वाघ, देवराव वाघ, पुण्यशोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त भारतीताई सोनवणे, मावळते जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगार यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कल्याणराव दळे यांनी आपल्या भाषणात समाजहितासाठी सर्व पोटजातींनी एकत्र येऊन ‘नाभिक’ या एकाच छत्राखाली संघटित राहण्याचे आवाहन केले. ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ‘महाज्योती’सारख्या संस्थांना पुरेसा निधी दिला जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. तसेच संत सत्यपाल महाराज यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची मागणी शासनाकडून वारंवार दुर्लक्षित होत असल्यावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. मनोहर खोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल शिंदे यांनी मानले. यशस्वी आयोजनासाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. समाजबांधवांची लक्षणीय उपस्थिती यामुळे मेळावा उत्साहात पार पडला.



