विष घेतलेल्या एरंडोल येथील ‘त्या’ कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील ( वय-५२ ) रा. खडका ता. चाळीसगाव यांनी वरिष्ठांच्या जांचाला २३ नोव्हेंबर रोजी विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आज शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वरिष्ठांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, संजय पाटील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात एम.एस. पदावर काम करतात. खडका येथून ते दररोज दुचाकीने अपडाऊन करत होते. सन २०१९ पासून त्यांना वरिष्ठांकडून कामाचा दबाव टाकत होते. त्यामुळे ते गेल्या अनेक महिन्यांपासून तणावात काम करत होते.  हा त्रास सहन न झाल्याने संजय पाटील यांनी ऑनड्यूटी कार्यालयात विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने एरंडोल येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने १ डिसेंबर रोजी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होतो. शुक्रवार ३ डिसेंबर रोजी दुपारी १२. १५ वाजेच्या सुमारास संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय पाटील यांनी मृत्यूपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलीसांच्या ताब्यात आहे. त्यात म्हटले आहे की, व्ही. एन. पाटील, व्ही.एल. सोनवणे, आर. व्ही. जाधव आण ठाकूर या चार अधिकाऱ्यांच्या जांचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

 

या घटनेमुळे संजय पाटील यांची पत्नी रजनी, मुलगा प्रशांत आणि शालक शांतराम पाटील यांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला होता. संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांसह नातेवाईकांनी घेतला आहे.

 

Protected Content