मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आयपीएल २०२५ साठी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी महालिलाव सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होणार आहे. या महालिलावात एकूण ५७४ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने पुढील तीन हंगामांसाठी काही महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयपीएलचे हे मोठे पाऊल आहे. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. आयपीएलसाठी जाहीर झालेल्या तारखांनुसार, आयपीएल २०२५ चा हंगाम १४ मार्चपासून सुरू होईल आणि अंतिम सामना २५ मे रोजी होईल. याबाबत बीसीसीआयने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही
तसेच आयपीएल २०२६ चा हंगाम १५ मार्च ते ३१ मे दरम्यान खेळवला जाईल, तर २०२७ चा हंगाम १४ मार्च ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, गुरुवारी फ्रँचायझींना पाठवलेल्या ईमेलमध्ये, आयपीएलने स्पर्धेच्या तारखांची विंडो दिली आहे. ही अंतिम तारीख असण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२५ मध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या तीन हंगामात इतकेच सामने खेळले गेले आहेत. जेव्हा बीसीसीआयने आपले मीडिया राइट्स विकले, तेव्हा प्रत्येक हंगामात ८४ सामने खेळले जाण्याची चर्चा होती, परंतु अद्याप तसे झालेले नाही.