जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने भाजीपाला घेवून सायकलने घरी जात असलेल्या प्रौढाला जोरदार धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
अधिक माहिती अशी की, हार्डवेअर दुकानावर काम करणारे मेहबुब खान अफिस खान (वय-५४) रा. पिंप्राळा हुडको हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. आज गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी सायकलने खंडेराव नगरात आले. भाजीपाला घेवून पुन्हा पिंप्राळाहुडको येथे सायकलने जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंप्राळा हुडको परिसरातील नागरीकांना घटनास्थळी गर्दी केली होती. घटनास्थळाहून ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला आहे. मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.