मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आपण सार्वजनीक जीवनात वावरतांना अनेक गुन्हे अंगावर घेतले. आताही खुनाचा गुन्हा चालेल, मात्र विनयभंगाचा नाही अशा शब्दांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याचे राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. यानंतर आव्हाड व पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत आव्हाड हे बोलतांना अनेकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात प्रदीर्घ काळापासून असल्याने गुन्हा दाखल होणे हे आपल्यासाठी नवीन बाब नाही. अनेकदा राजकीय वैमनस्यातून देखील गुन्हे दाखल झालेत. मात्र आता चुकीच्या पध्दतीने लागोपाठ दोन गुन्हे दाखल झाले. यातच विनयभंगासारखा गुन्हा हा मनाला व्यथीत करणारा आहे. हा सर्व भयंकर प्रकार आहे. यामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी हा गुन्हा सिध्द न केल्यास आपण त्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा देखील त्यांनी याप्रसंगी दिला. तर एक वेळ खुनाचा गुन्हा चालला असता मात्र विनयभंगाचा नाही असे सांगत त्यांनी रोष व्यक्त केला.