नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र येणार असल्याचे वृत्त आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात आज दुपारी दिल्लीतील पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत आघाडीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
दिल्लीत काँग्रेस आणि आप हे लोकसभेच्या प्रत्येकी ३ जागा लढणार असून, एक जागा अपक्ष उमेदवारासाठी सोडली जाणार असल्याचे कळते. तर एक जागा भाजपवर सातत्याने टीका करणारे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी सोडली जाणार आहे. काँग्रेससोबत आघाडी करण्यास ‘आप’ आधीपासूनच उत्सुक होता. तर आता राजकीय वातावरण बदलल्यामुळे काँग्रेसही आघाडीसाठी तयार झाली आहे. काँग्रेस आणि आपमध्ये समान जागावाटपाच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. दरम्यान, दिल्लीतच नव्हे तर पंजाबमध्येही काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष आघाडी करून लढण्याची शक्यता आहे.