नवीदिल्ली (वृत्तसंस्था) देशातील लोकसभा निवडणुकीच्या उद्या (दि.२३) लागणाऱ्या निकालावर पाकिस्तानचे बारीक लक्ष असल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी हे पुन्हा सत्तेवर येण्याबाबत सामान्य पाकिस्तानी नागरिकांनी संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करत केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानी नागरिकांचे हे मत बनले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव लक्षात घेता भारतातील निवडणूक निकालावर पाकिस्तानचे लक्ष असणे ही आश्चर्याची गोष्ट नसल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
भारतात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार येऊ नये, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाकिस्तानी नागरिक पाकमधील वृत्तवाहिन्यांवर देत आहेत. पाकमधील सोशल मीडियावर देखील अशाच प्रकारची मते पाहायला मिळत आहेत. ‘मोदींना पुन्हा सत्तेत यायला नको. त्यांनी पाकिस्तानात सर्जिकल स्टाइक केले आहे’, अशी प्रतिक्रिया लाहोरचा रहिवासी असलेले शाही आलम याने व्यक्त केली आहे.
त्याचवेळी परदेशात राहणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांचे मत मात्र वेगळे आहे. लंडनमध्ये राहणारे पाकिस्तानी उद्योजक रियाझ यांनी मोदी हेच पुन्हा सत्तेत यावेत, असे मत मांडले आहे. मोदी सत्तेत आल्यास पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादी संघटना नष्ट होतील आणि पाकिस्तानी भूमीवरील दहशतवाद निपटून काढण्याच्या दृष्टीने पाक सरकारवर दबावही निर्माण होईल, अशी बोलकी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.
पाक पंतप्रधान इम्रान खान याने मात्र काही महिन्यांपूर्वी मोदी यांनी २०१९ ची निवडणूक जिंकली तर दोन्ही देशांमध्ये शांततेच्या चर्चेसाठी चांगली संधी निर्माण होईल, असे मत व्यक्त केले होते, पण हे मत म्हणजे मोदींबद्दल भारतीय जनतेत असलेली आपुलकी आणि विश्वास कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे मत राजकीय जाणकारांनी तेव्हा मांडले होते. आता निवडणूक निकालाचे कल बघता इम्रान याचा हा प्रयत्न सपशेल फसल्याचे चित्र दिसत आहे.