मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील वनउद्यानाचा भोंगळ आणि बेफिकीर कारभार अद्यापही कायम असून, वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने विनातिकिट प्रवेश आणि अनधिकृत पैसे वसुलीवर प्रकाश टाकत बातमी प्रकाशित केल्यानंतर उद्यान तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र काही दिवसांनी पुन्हा बिनधास्तपणे विनातिकिट प्रवेश सुरू झाला असून, सर्व प्रकारण ‘जैसे थे’ असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून हरताळा वनउद्यानात विनातिकिट प्रवेश देत पर्यटकांकडून अनधिकृत रीत्या पैसे वसूल केले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना याचा अधिक फटका बसतोय. काही दिवसांत अशा तक्रारी पुन्हा वाढल्या असून, त्यातून वनविभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, मिलीभगत आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

शहरातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबर उद्धट भाषा, शिवीगाळ, तसेच पर्यटकांशी वाद घालण्याचे प्रकारही सुरूच आहेत. वनउद्यानात नेमलेला कर्मचारी पर्यटकांशी अरेरावीने बोलतो, धमकीवजा भाषा वापरतो आणि काही वेळा थेट दादागिरी करतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हा त्रास दिवसेंदिवस वाढतो आहे, असे स्थानिक नागरिक सांगतात.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे सरकारी उद्यान असूनही संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती, रोजंदारी किंवा वेतन याबाबत कोणताही अधिकृत दस्तावेज नाही. उलट, या कर्मचाऱ्याद्वारे वसूल होणाऱ्या बेकायदेशीर पैशांमध्ये वनपरिक्षेत्र कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचीही भागीदारी असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे वनविभागाच्या नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखवली गेली आहे. या संदर्भात काही सुज्ञ नागरिकांनी उपवनसंरक्षक कार्यालयाकडे तक्रारी केल्या असूनही त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा वनउद्यान सामान्य जनतेच्या हितासाठी कधी उपयोगी पडेल? वनविभागाचा हा खुलेआम सुरू असलेला भ्रष्ट कारभार आणि नागरिकांची आर्थिक लूट कधी थांबणार? या प्रश्नांचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आणि त्यामुळे जनतेचा संयमही सुटत चालला आहे.



