नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान मोदी यांनी आज देशवासियांनी संवाद साधतांना देशातील १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीचे केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार असल्याची महत्वाची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, पोलिओसह अनेक लशींसाठी देशवासियांना वाट बघावी लागली. पण, २०१४ मध्ये भारतात लसीकरणाचा वेग ६० टक्केच होता. उत्पादनाचं प्रमाण खूप कमी होतं. हे आमच्यासाठी खूप चिंतेची गोष्ट होती. त्याच वेगानं जर लसीकरण झालं असतं, देशाला ४० वर्ष लागले असते. पण, यासाठी सरकारनं मिशन इंद्रधनुष्य सुरू केलं. लस तयार केली जाईल आणि ज्याला गरज आहे. त्याला दिली जाईल, केवळ सहा वर्षात लसीकरणाचा वेग ६० टक्क्यांवरून ९० टक्के झालं. सरकारने लसीकरणाचा वेग वाढवलाच, पण त्याचा विस्तारही केला,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
“आज हा निर्णय घेण्यात आला की, राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं २५ टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे. या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी ७५ टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही. त्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला लस खरेदीवर कोणताही खर्च करावा लागणार नाही. आतापर्यंत देशातल्या करोडो लोकांना मोफत लस मिळाली आहे. आता यात १८ वर्षांपुढील लोकंही समाविष्ट होतील.
मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल अशी घोषणा मोदी यांनी केली.