नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने लडाखबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील माहिती अधिकृत एक्स अकाउंटवरून दिली आहे. तसेच लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याचा निर्णय हा विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी घेतल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे. दरम्यान, लडाखमध्ये आता ज़ंस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग असे पाच नवीन जिल्हे स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवर पोस्ट करत लडाखच्या लोकांचे अभिनंदन केले आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ज़ंस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे आता प्रशासनाला बळ देतील आणि लोकांसाठी फायद्याचे ठरतील. मोदी सरकार लडाखमधील लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे”, असे अमित शाह यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.