मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा दोन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात फक्त मोजके मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आज समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सर्वांना वेध लागले ते मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे ! यात कुणाला कशी खाती मिळतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान विस्तार नेमका कधी होणार याबाबतची माहिती शिंदे गट व भाजपा यांच्यातर्फे अद्याप देण्यात आलेली नाही. तथापि मंत्रिमंडळाच्या विस्ताराची अतिशय जय्यत तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
या अनुषंगाने आज सायंकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक देखील सुरू झालेली आहे. यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हा विस्तार एकाच वेळेस न होता दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
दि.११ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्ता संघर्षबाबत महत्त्वाची सुनावणी अपेक्षित आहे. याच दिवशी या सुनावणीचा निकाल देखील अपेक्षित आहे. यामुळे ११ तारखेनंतर मंत्रिमंडळातील पहिला विस्तार होणार असल्याचे आधीपासून मानले जात होते. तथापि ताज्या वृत्तानुसार याआधी म्हणजे शुक्रवारी अथवा शनिवारीसुद्धा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होण्याची शक्यता आहे. या पहिल्या विस्तारामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील मोजके मंत्री शपथ घेतील. तर काही दिवसानंतर दुसरा शपथविधी सोहळा होणार असून यात उर्वरित मंत्री शपथ घेतील. दरम्यान मंत्रिमंडळातील चार ते पाच जागा खाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे.