आता आदित्य ठाकरे यांची राज्यभरात ‘निष्ठा यात्रा’

मुंबई लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आता माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यभरात निष्ठा यात्रा काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गट फुटल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर शिंदे यांच्याच नेतृत्वाखालील सरकारने शपथविधी घेतला असून आता आमदारांच्या पाठोपाठ खासदार आणि राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी हे देखील त्यांच्या गटात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने ते राज्यभरात निष्ठा यात्रा काढणार असल्याची माहिती आज समोर आली आहे.

आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून सुमारे पंधरा दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये फिरणार आहेत. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन ते जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. तसेच या दौऱ्यात ते संघटनात्मक बांधणीवर देखील लक्ष देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे आता आदित्य ठाकरे हे खऱ्या अर्थाने मैदानावर उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या यात्रेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Protected Content