मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातून लुटलेल्या संपत्तीबाबत ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या अहवालाने उघड केलेली माहिती अतिशय महत्त्वाची आहे. या अहवालानुसार, १७६५ ते १९०० या कालखंडात ब्रिटिशांनी भारतातून तब्बल ६४.८२० लाख कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती लुटली. या संपत्तीचा मोठा हिस्सा फक्त श्रीमंत वर्गाच्या ताब्यात गेला. विशेषतः, १० टक्के अतिश्रीमंत व्यक्तींना ३३,८०० अब्ज डॉलर्सचा फायदा झाला.
१७६५ ते १९०० या कालावधीत ब्रिटिशांनी भारतातील संपत्तीचे अत्याधिक शोषण केले. लुटलेली संपत्ती ब्रिटनच्या विकासासाठी वापरली गेली, ज्यामुळे औद्योगिक क्रांती वेगाने घडली. या संपत्तीचा सर्वाधिक लाभ ब्रिटनमधील अतिश्रीमंत वर्गाने घेतला. अहवालात म्हटले आहे की, लुटीच्या या संपत्तीचा ५२% हिस्सा १०% श्रीमंत लोकांना गेला, तर उर्वरित ३२% हिस्सा नव्याने उदयास आलेल्या मध्यमवर्गाकडे गेला. या लुटीच्या प्रक्रियेमुळे भारतात आणि ब्रिटनमध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढीस लागली. वसाहतवादी लुटीमुळे एकीकडे भारत कंगाल होत गेला, तर दुसरीकडे ब्रिटन समृद्ध होत गेला. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, आधुनिक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आर्थिक व्यवस्था वसाहतवादाच्या त्या ऐतिहासिक पायावर उभ्या आहेत. त्यामुळे आजही विषमता टिकून आहे.
ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे शोषण करून ती पूर्णतः कमजोर केली. यातून भारतीय कुटीरउद्योग नष्ट झाले, शेतीवर आधारित अर्थव्यवस्थेचा ऱ्हास झाला, आणि भारतीय समाज आर्थिकदृष्ट्या कमजोर झाला.ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे की, वसाहतवादाने निर्माण केलेल्या असमानतेचे परिणाम आजही जगभर जाणवतात. या लुटमारीच्या विकृतींमुळे जगात वंशवाद, विषमता, आणि विभाजनाची स्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळातील लुटमारीचे परिणाम भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर आजही दिसून येतात. हा इतिहास समजून घेऊन जगाने विषमतेविरुद्ध ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.