पाचोरा प्रतिनिधी । वडीलांचे पहिले श्राध्दचा कार्यक्रम सुरू असतांना मुलाचा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज पाचोरा येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सतिष नरहर वाणी हे पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील मुख्याध्यापक स्व. नरहर वाणी यांचे चिरंजीव होते. कै. नरहर वाणी यांचे मागील वर्षी याच दिवशी निधन झाल्याने त्यांचे शुक्रवारी पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे पहिले वर्षे श्राद्ध होते. त्यानिमित्त सतीष वाणी हे पिंपळगाव (हरेश्र्वर) येथे आले होते. वर्ष श्राद्धानिमित्त २०० नागरिकांना जेवणासाठी स्वयंपाक केला होता. दुपारी उपस्थित सर्व पाहुणे व इतर मान्यवरांचे जेवण आटोपून सतिष वाणी हे शेवटच्या पंगतीत जेवणासाठी बसले असतांना त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. दरम्यान पिंपळगाव (हरेश्र्वर) येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पाचोरा येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला.
पाचोरा येथे नेत असतांना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. सतिष नरहर वाणी हे चाळीसगाव येथे शासकीय रुग्णालयात औषध निर्माता म्हणून सेवा देत होते. त्यांचा काही वर्षांपूर्वी पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर दुसरा विवाह झाला असून त्यांची पत्नी सात महिन्याची गरोदर असल्याचे समजते. त्यांचे पाश्चात्य वृध्द आई, एक भाऊ, एक बहीण व पत्नी असून ते वरसाडे ता. पाचोरा येथील आश्रम शाळेचे शिक्षक सुहास नरहर वाणी यांचे लहान बंधू होत.