पहूर ,ता. जामनेर प्रतिनिधी- येथून जवळच लोंढरी तांडा येथील बेपत्ता तरुण अल्पभूधारक शेतकऱ्याचा मृतदेह गावालगत असलेल्या विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की ,जामनेर तालुक्यातील लोंढरी तांडा येथील रहीवासी तरुण शेतकरी राजमल सोना चव्हाण (वय २८ वर्षे ) हे रविवार (ता. ४ ) रात्री ९ वाजेपासून पासून बेपत्ता होते . नातेवाईकांसह गावकऱ्यांनी रात्रभर आजूबाजूला शोध घेतला असता पहाटे ३ वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या शिवदास नामदेव भागवत यांच्या विहिरीजवळ शौचास जाण्याचा डबा आढळून आल्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा संशय बळावला . विहिरीत काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचे जाणवत होते . ९० फूट खोल असलेल्या विहीरीत सुमारे ७० – फूट पाणी असल्याने निष्पन्न होवू शकत नव्हते .घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी विहीरीची पाहणी केली .
दरम्यान विहिरी जवळच शौचासच्या डब्यासह पाऊल खुणा आढळून आल्याने तसेच विहिरीत संशयास्पद वस्तू दिसत असल्याने शोध कार्य सुरू झाले . ३ ते ४ वीज पंपाद्वारे विहिरीतील पाणी उपसण्यात आले .पहूर आणि सोनाळा येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी मृतदेहाचा शोध घेतला .शेवटी आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तब्बल ३५ तासानंतर मृतदेह गळाला लागला . पाण्यात मृतदेह कुजला असल्याने जागेवरच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . कुमावत यांनी शवविच्छेदन केले.
बीट हवालदार शशिकांत पाटील यांनी पंचनामा केला .याप्रकरणी विजय सोना चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . आज दुपारी १ वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात त्यांच्यावरअंत्यसंस्कार करण्यात आले .
दरम्यान मयत राजमल चव्हाण यांच्यावर खाजगी बँकेसह बचत गटाचे कर्ज होते .सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा त्यामुळे ते नेहमीच विवंचनेत राहायचे . काही दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या करण्याचा विचार बोलूनही दाखवला होता , अशी माहिती स्थानिक रहीवाश्यांनी दिली . त्यांच्या पश्च्यात तीन चिमुकल्या मुली ,पत्नी , आई , आजी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने लोंढरी तांडा येथे हळहळ व्यक्त होत आहे .