नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सैन्यदलाला त्रुटीपूर्ण शस्त्रास्त्रं पुरवली जात असून त्यामुळे सैन्यदलाचे मोठे नुकसान होत आहे, अपघातांमध्ये वाढ होते, असा आरोप भारतीय सेनेने शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या कारखान्यांचा समितीवर (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) केला आहे. दरम्यान ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये शस्त्रांस्त्रामध्ये त्रुटी असल्यामुळे युद्धभूमीवर जवानांचे मोठे नुकसान होत आहे. देशात सरकारी ४१ कारखान्यांमध्ये सैन्यदलाच्या शस्त्रास्त्रांची निर्मीती होते. या कारखान्यांवर सरकार १९,००० कोटी रुपये खर्च करते तर १२ लाख जवानांनाही शस्त्रास्त्रं पुरवली जातात. ‘एकाही शस्त्रामध्ये थोडीशी जरी त्रुटी राहिली तर जवानाच्या जीवावर बेतू शकते’असे सैन्यदलाने आपल्या संरक्षण निर्मीती खात्याचे प्रमुख सचिव अजय कुमार यांना लिहिलेल्या १५ पानी पत्रात म्हटले आहे. सैन्यदलाला पुरवण्यात येणाऱ्या शस्त्रांस्त्रामध्ये त्रुटी आढळणे, खपवून घेतले जाणार नाही असेही या पत्रात सांगण्यात आले आहे. तसंच याबाबत लगेच पाऊले उचलली जावीत, असा सल्लाही देण्यात आला आहे.
१५ पानी पत्रात कोणत्या शस्त्रांमुळे दररोज अपघात होत आहेत, कोणत्या शस्त्रांमुळे क्वचित अपघात होतात याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विविध बंदुका ,पिस्तुलं, बोफोर्सच्या तोफांचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. शस्त्रांस्त्रांमधील त्रुटींबद्दल अमेरिकन अधिकाऱ्यांनीही २०१७ रोजी प्रश्चचिन्ह उपस्थित केले होते. पोखरण येथे झालेल्या एका युद्धाभ्यासादरम्यान एम७७७ अल्ट्रालाईट होइट लायझर ही बंदूक तुटली होती. अमेरिकन मॉडेलच्या १४५ अशा बंदुकाची भारतीय सैन्य अमेरिकेसोबत निर्मिती करणार होते. त्याच्या निर्मितीत कुचराई झाली असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला होता.
ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत. शस्त्रास्त्रांची नीट तपासणी आणि परीक्षा केल्याशिवाय ती जवानाच्या हातात आम्ही देतच नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ‘शस्त्रास्त्रांमध्ये काहीच त्रुटी नाही. सेना शस्त्रांचा नीट वापर करत नाही. ही शस्त्र कुठे ठेवावी, याबाबत सैन्यदलात संभ्रम आहे. शस्त्रांचा वाजवीपेक्षा जास्त आणि अयोग्य पद्धतीने वापर केला जातो, म्हणून ती खराब होतात.’असा खुलासा देत बोर्डाने चेंडू सैन्यदलाच्या कोर्टात टाकला आहे. तेव्हा याबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.