नवी दिल्ली-वृत्तसेवा | भारतीय जनता पक्षाने आज आपली तब्बल १९५ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नसल्याने उत्सुकता ताणली गेली आहे.
आगामी लोकसभा निवडणूक ही एप्रिल-मे महिन्यात होणार असून यासाठी येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने आधीपासूनच निवडणुकीच्या नियोजनात आघाडी घेतली असून आज पक्षाने उमेदवार जाहिर केले आहेत. आज सायंकाळी दिल्लीत भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते महासचिव विनोद तावडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. तावडे म्हणाले की, गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने सेवेचे अदभूत उदाहरण जगाला दाखवून दिले आहे. यंदा पंतप्रधानांनी चारशेच्या पार जागांचा संकल्प व्यक्त केला असून जनता या आवाहनाला प्रतिसाद देणार असल्याचा आम्हाला विश्वास आहे.
याप्रसंगी त्यांनी १९५ उमेदवारांची यादी जाहीर करत असल्याची घोषणा केली. यात उत्तरप्रदेशातील ५१, पश्चीम बंगालमधील २६, मध्यप्रदेश २४, गुजरात १५, राजस्थान १५, केरळ १२, तेलंगणा ९, झारखंड ११, छत्तीसगड ११, दिल्ली ५, जम्मू-काश्मीर-२, उत्तराखंड-३, अरूणाचल-३, गोवा-१, त्रिपुरा-१, अंदमान निकोबार-१, दमण दीव-१ अशा उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे विनोद तावडे म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान मोदी हे पुन्हा एकदा वाराणसीमधून लढणार असल्याचे विनोद तावडे यांनी जाहीर केले. यानंतर त्यांनी आसामपासून सुरूवात करून एक-एक उमेदवाराचे नाव जाहीर केले. लक्षणीय बाब म्हणजे यात महाराष्ट्रातील एकाही जागेची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून पुर्णत्वाला आलेला नसल्यामुळे महाराष्ट्राच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नसावी असे मानले जात आहे.
आजच्या पहिल्या यादीत ३४ केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री तसेच दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश असून एकूण २८ महिलांना तिकिटे देण्यात आलेली आहेत.