युपीतील वातावरण चिघळले, अखिलेशही पोलिसांच्या ताब्यात

लखनऊ वृत्तसंस्था | शेतकरी आंदोलनातील हत्याकांडानंतर युपीतील वातावरण चिघळले असून प्रियंका गांधी यांच्या पाठोपाठ समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांना देखील पोलिसांनी अटक केल्याने अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.

लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे युपीमध्ये प्रचंड तणाव पसरला आहे. आंदोलक शेतकर्‍यांना भेटण्यासाठी गेलेल्या प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी देखील शेतकर्‍यांची भेट घेणार असल्याची घोषणा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्थानबद्द केले आहे. अखिलेश यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अखिलेश यांना रोखण्यात आल्यानंतर त्यांनी घराबाहेर धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले आहे.

अखिलेश यादव लखीमपूर खेरीला जात असताना त्यांना यूपी सरकारच्या आदेशावर पोलिसांनी रोखले, असा दावा पक्षाने केला. त्यानंतर शेकडो सपा समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. अखिलेश यादव यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या वाहनाला आग लावण्याची घटना घडली आहे.

 

 

Protected Content