अंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे. आता यांची थोडी फजिती झाली आहे, विधानसभा निवडणुकीत आणखी जास्त फजिती होईल, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे.दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाला सगेसोय-यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी ८ जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. सोमवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगेसोय-यांचे आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील. उपोषणाच्या काळातच सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नंतर नको. अन्यथा सरकारला आमचा रोष परवडणारा नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले होते. शपथविधीच्या निमित्ताने दिल्लीत मी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आलो होतो. त्यावेळी आमची मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. यावर लवकरच आम्ही तोडगा काढू, असे अजित पवार यांनी म्हटले होते. याबाबत जरांगे-पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, मी पहिल्यापासून तेच तर सांगतो आहे.
आम्हाला राजकारण करायचे नाही. आमची लेकरे मोठी झाली पाहिजेत. यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत आहोत. आम्ही दिलेल्या व्याख्येनुसार सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या यासाठीच आम्ही जीव जाळतोय, पण दिले नाही तर कुणालाही सोडणार नाही. मी एवढा विरोध मराठ्यांसाठी करतोय आम्हाला दुसरे काही अपेक्षित नाही, असेही मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचे जालना लोकसभेचे खासदार कल्याण काळे यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी जरांगे पाटील आणि त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेदरम्यान जरांगे पाटील कल्याण काळे यांच्याजवळ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेविषयी नापसंती व्यक्त केली. एकीकडून गोरगरीब मराठ्यांची मतं घ्यायची आणि एकदा मते घेतली की, मराठ्याच्या विरोधात बोलायचे. असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.