भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील दिपनगर येथे प्रकलपग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीचा वतीने विविध मागण्यांसाठी ‘शक्ती गड’ दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे दिंडी मोर्चा नुकताच काढण्यात आला.
प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थींना ‘महाजनको’मध्ये सहभागी करून घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीने ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना साडी-चोळीचा आहेर घेवून भर पावसात शक्ती गड दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र गाठले. भजन म्हणत हा दिंडी मोर्चा शांततेत शक्ती गड येथे पोहोचल्यावर गेटवरच मोर्चेकरुंना सुरक्षा रक्षकांनी अडवले. चार तास शक्ती गडाच्या गेटजवळ मोर्चा ठाण मांडून होता.
जोपर्यंत मुख्य अभियंता स्वतः येवून निवेदन व साडी चोळीचा अहेर स्वीकारत नाही. तो पर्यंत गेट समोरून न हटण्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतल्याने अखेर घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मुख्यअभियंता हे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले नव्हते. अखेर मुख्य अभियंत्यांनी आंदोलकांना पत्र देत ५ जणांना चर्चेसाठी बोलावले. मोर्चातील ५ सदस्यांनी मुख्य अभियंता पंकज सपाटे यांना आपल्या विविध मागण्या सांगत निवेदन दिले. यावेळी सुरक्षा अधिकारी के.एल.पाटील यांनी पत्रकारांना आत जाण्यास मज्जाव केला. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, सचिव सुभाष झांबरे, सहसचिव आकाराम भिरुड यांच्यासह समितीचे पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी व त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.