जळगाव (प्रतिनिधी) आगामी विधानसभा निवडणूकांच्या कालावधीतच सण व उत्सव येत असल्याने या निवडणूका निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आतापासूनच नियोजन करावे. अशा सुचना राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव श्री. मेहता यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, राज्य उत्पादन शुलक् विभागाचे अधिक्षक श्री. आढाव, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, सहाय्यक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्य सचिव श्री मेहता म्हणाले की, येत्या निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्ह्यात स्वीप कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा. दिव्यांग मतदारांना आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन द्या. आचार संहिता कालावधीतच सण व उत्सव येत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस दलाने दक्ष रहावे. बंदोबस्तासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास अगोदरच कळवावे. मागणी आल्यास तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करुन दिले जाईल. असे सांगून श्री. मेहता म्हणाले निवडणूक कालावधीत कडेकोट बंदोबस्त ठेवा. जेणेकरुन निवडणूकीसंबंधी कुठलीही तक्रार येता कामा नये. प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस दलाने आपल्या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात चेकपोस्ट सुरु करावे. अवैध दारु विक्री होणार नाही याची उत्पादन शुल्क विभागाने तर कुठल्याही प्रकारची अवैध वाहतुक होणार नाही. याची परिवहन विभागाने दक्षता घेऊ राष्ट्रीय व राज्य मार्गावर गस्त वाढविण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधितांना दिल्यात.
यावेळी श्री. मेहता यांनी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्याकडून स्वीप उपक्रमातंर्गत व्हीव्हीपॅट ची जनजागृती, प्लाईंग स्कॉड, व्हीएसटी पथके, शस्त्र जमा करण्याची कार्यवाही, जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्राची माहिती, निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण, वाहतुक आराखडा आदिची माहिती घेतली तसेच पोलीस अधिक्षक डॉ. उगले यांच्याकडून सद्य:परिस्थितीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व जिल्ह्याचा सुरक्षा आराखडा, सीमावर्ती भागातील बंदोबस्त आदिंची माहिती घेऊन निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्यात.