चाळीसगाव प्रतिनिधी । दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या आरोपी चाळीसगाव बस स्थानकाजवळ असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी सापळा रचत त्यास ताब्यात घेतले आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, चाळीसगाव शहरातून हद्दपार करण्यात आलेला अक्षय भानुदास पाटील(वय २४, रा. लक्ष्मी नगर) हा आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास स्वराज हॉस्पिटल समोर आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यास उपविभागीय दंडाधिकारी चाळीसगाव यांनी २८ जुलै रोजी तडीपार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करून २ ऑगस्ट रोजी नाशिक, औरंगाबाद, धुळे नंदुरबार जिल्ह्यातुन दोन वर्षाच्या कालावधीकरता तडीपार करण्यात आलेले आहे. अक्षय पाटील हा तडीपार असतांना तो चाळीसगाव शहरात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यात अक्षय हा चाळीसगाव शहर बस स्टँडच्या पाठीमागे फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या आदेशाने सपोनी कापडणीस, सफौ. अनिल अहिरे, अमोल भोसले शैलेन्द्र पाटील यांचे पथक शहर बस स्टँडच्या पाठीमागे गेले असता त्यांना अक्षय पाटील हा स्वराज हॉस्पिटलसमोर उभा आढळून आला. त्यास पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने हद्दपार आदेशाचा भंग करुन हद्दपार कालावधीत बेकायदेशीरपणे चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे मिळुन आला म्हणुन शैलेन्द्र पाटील यांनी मुंबई पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशिर फिर्याद दिली आहे.