जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीतील १९ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ फेब्रुवारी २०२५ रोजी भागलपूर, बिहार येथे वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम संपूर्ण देशभर “किसान सन्मान समारोह” म्हणून साजरा केला जाणार असून विविध राज्यांमध्येही हे वितरण समारंभ आयोजित केले जात आहेत.
९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ
पी.एम. किसान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणिकरण करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत या निकषांची पूर्तता करणाऱ्या ९२.८९ लाख शेतकरी कुटुंबांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. २४ फेब्रुवारीला एकूण १९६७ कोटीहून अधिक रक्कम या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाणार आहे.
राज्यभरात “किसान सन्मान समारोह” आयोजन
राज्यातील कृषी विज्ञान केंद्र, जिल्हा, तालुका आणि ग्राम पंचायत स्तरावर हा “किसान सन्मान समारोह” आयोजित करण्यात येणार आहे. या समारंभामध्ये प्रगतशील शेतकरी, कृषी तज्ज्ञ आणि मान्यवर उपस्थित राहणार असून चर्चासत्रे, कृषी प्रदर्शन, विविध योजनांची माहिती आणि लाभ वितरणाचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या अग्रोस्टॅक योजनेंतर्गत “शेतकरी माहिती संच” आणि “फार्मर आयडी” तयार करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया नागरी सुविधा केंद्रांवर राबवली जात आहे.
मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री सातारा येथून होणार सहभागी
या समारंभात राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री सातारा येथून सहभागी होणार आहेत. राज्यभरात हा सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणार आहे. कृषी विभाग, महसूल व वने विभाग, ग्राम विकास विभाग, कृषी विज्ञान केंद्रे आणि शेतकरी उत्पादक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. शेतकऱ्यांनी https://pmindiawebcast.nic.in या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण पाहावे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.